चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या नव्याने अद्ययावत होणाऱ्या सभागृहाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याचा निर्णय वाचनालयाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
चिपळूणला आलेल्या महापुरात वाचनालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आणि मुंबई-गोवा महामार्गावरील अश्मयुगकालीन वस्तूंची उपलब्धी असलेले प्रसिद्ध वस्तूसंग्रहालय उद्ध्वस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर आता संग्रहालय वाचनालयाच्या नव्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर उभारले जाणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी लागणाऱ्या जागेची आवश्यकता लक्षात घेऊन सध्याचे संग्रहालय असलेल्या तळ मजल्यावरील जागी नव्याने बाळशास्त्री जांभेकर सभागृह साकारले जाणार आहे, अशी माहिती ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि कार्यवाह धनंजय यांनी ही माहिती दिली आहे.
बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार, आद्य प्राध्यापक आणि आद्य समाजसुधारक होते. आचार्य अत्रे यांनी केलेल्या टिप्पणीनुसार, ‘बाळशास्त्री जांभेकर हे कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता त्यांनी आपल्या दर्पण नियतकालिकामधून सामाजिक सुधारणेवर भर दिला होता. वडील पंडित गंगाधरशास्त्री आणि धार्मिक आणि धर्मपारायणवादी आई सगुणाबाई यांचा वारसा बाळशास्त्रींना मिळाला होता. कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे नाव वाचनालयाने सभागृहाला देणे भूषणावह आहे, असे डाॅ. यतीन जाधव यांनी सांगितले.