रत्नागिरी : पर्यटन योजनेचे आमीष दाखवत लाखो रुपये लुबाडल्याचा आरोप होत असलेल्या हिम्बज् हॉलिडेज् प्रा. लि.चे रत्नागिरीतील कार्यालय सील करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून मुंबईच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. सॅफरॉनपाठोपाठ आर्थिक फसवणुकीचा हा दुसरा प्रकार उघड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. हे कार्यालय रत्नागिरी रेल्वेस्टेशन फाट्याजवळ प्रमिला कॉम्प्लेक्स फेज १ मध्ये होते. सॅफरॉनने गुंतवणूकदारांची केलेली नऊ कोटींची फसवणूक पुढे आल्यानंतर आता हिम्बज्कडून गुंतवणूकदारांची किती कोटींची फसवणूक झाली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरीतील कुवारबाव रेल्वेस्टेशन फाट्याजवळ प्रमिला कॉम्प्लेक्समध्ये गेल्या काही वर्षांपासून हिम्बज्चे हे कार्यालय सुरू होते. गेल्या चार ते पाच वर्षांच्या काळात या कंपनीत अनेकांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात हे कार्यालय बंद झाले. त्यानंतर या कंपनीने पर्यटनाच्या नावाखाली राबविलेल्या विविध आर्थिक योजनांमध्ये गुंतविलेले पैसे बुडणार का, या शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. हिम्बज्ने फसवणूक केल्याची तक्रार झाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने भारतीय दंडविधान ४२०, ३४ सह कलम ३ व ४, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितरक्षण (वित्तीय आस्थापनांमधील) कायदा १९९९ नुसार गुन्हा नोंदविला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई झाली. ९ जुलै २०१४ रोजी मालमत्ता जप्त केली असल्याची नोटीस दोन्ही गाळ्यांवर लावण्यात आली आहे. त्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक व दोन पंच यांची स्वाक्षरी आहे. जप्त केलेली मालमत्ता विशेष सत्र एम.पी.आय.डी. न्यायालयाच्या आदेशाखेरीज कोणासही खरेदी, विक्री, हस्तांतर, गहाणखत, भाडेपट्टा आदी व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या मालमत्तेबाबत कोणास म्हणणे मांडावयाचे असल्यास किंवा काही सांगावयाचे असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे विभाग, कक्ष-७, जी.पी.ओ.समोर, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१ कार्यालय, दुसरा माळा, मुंबई-४००००१ येथे संपर्क साधण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी) तारखेत खाडाखोड! सील केलेल्या दोन्ही गाळ्यांवर चिकटविलेल्या नोटीसमध्ये जावक क्रमांक १४९९/आगुशा/कक्ष-७/२०१४ असे नमूद आहे. मात्र, या दोन्ही नोटिसीमध्ये टाकलेल्या ०९/०७/२०१४ या तारखेतील सात या महिन्यांच्या अंकात खाडाखोड केल्याचे दिसत आहे.
हिम्बज् हॉलिडेज्चे कार्यालय सील लाखोंची फसवणूक?
By admin | Published: July 17, 2014 11:58 PM