मेहरुन नाकाडे- रत्नागिरी --शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गात प्रवेश देण्यात येतो. आठवीपर्यंत पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना पाठविले जात असल्यामुळे नववीच्या वर्गात पास होणे अवघड जाते किंबहुना त्याचा परिणाम दहावीत दिसून येतो. त्यामुळे आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करता पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय रद्द करण्याची शक्यता आहे. या निर्णयाचे काही शिक्षकवर्गातून स्वागत करण्यात येत असून, तर काही शिक्षकांमध्ये सर्वशिक्षा अभियान योग्य आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पहिली ते आठवीपर्यंत जे विद्यार्थी नापास होतात, त्यांना त्याच वर्गात बसवण्याऐवजी पुढील वर्गात ढकलण्यात येत होते. त्यामुळे आठवीच्या वर्गात आल्यानंतर मात्र त्यांना आधीचं येत नसल्याचे दिसून येते. परिणामी शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय रद्द करण्याचा शासनाचा विचार आहे. काही शाळांमधील तिसरीच्या, पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीचे पुस्तकही वाचता येत नव्हते. विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहिल्याने त्याचा परिणाम दहावीच्या निकालावरही होत होता. ज्या शाळांच्या पहिली ते नववीपर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या आहेत, त्या शाळांची दहावीची केवळ एकच तुकडी आहे. दहावीचा निकाल राखण्यासाठी काही शाळांनी शक्कल लढवून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश, तर तळ्यात-मळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सतरा नंबरचे फॉर्म भरण्यात येत असत. जेणेकरून शाळेचा दर्जा राखण्यास मदत होत असे.आठवीपर्यंत पासमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय नष्ट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मकवृत्ती कमी झाल्यामुळे परीक्षा पध्दती व अभ्यासाचे गांभिर्य राहिलेले नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत असलेला दिसून येत आहे. वास्तविक सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन करण्यात येत असे. त्यामुळे अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमधील क्रीडा, कला गुण हेरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येत असे. जेणेकरून अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना वाव मिळून संबंधित विद्यार्थी कौतुकास पात्र ठरत असे. काही शाळांनी आपला शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी परीक्षा पध्दत सुरू ठेवली असली तरी शासकीय निर्णयानुसार ग्रेड पध्दतीचा अवलंबन करण्यात येत असे. इतकेच नव्हे; तर विद्यार्थी ज्या विषयात नापास झाला आहे किंवा कमी गुण मिळाले आहेत, त्याबाबत खास विद्यार्थ्यांसाठी वर्गात जादा तास घेऊन त्यांच्यासाठी विशेष अध्यापन केले जात आहे. जेणेकरून संबंधित विद्यार्थ्यांना कोठेतरी एका विशिष्ट पातळीवर आणण्याचा प्रयत्न असे. यासाठी असलेले शिक्षक व मुख्याध्यापकांचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. परंतु ज्यांना विशेष मेहनत करायचीच नाही, त्यांच्यासाठी मात्र ते सोपे होते. वास्तविक शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे परीक्षा पध्दतीचा निर्णय घेताना तज्ज्ञांनी एकत्र येवून विचार करणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार केला जावा. परीक्षा पध्दती अवलंबताना केवळ हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रीत न करता जे अभ्यासात कमकुवत ठरत आहेत, त्यांना बरोबरीला आणण्यासाठी विशेष मेहनत करणेही गरजेचे आहे. असे असले तरी शासनाच्या विचाराधीन असलेल्या निर्णयाबाबत शिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, परीक्षा पध्दती योग्य असल्याची प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहे.
दर्जा टिकण्यासाठी परीक्षा हव्यातच!
By admin | Published: December 02, 2014 10:42 PM