रत्नागिरी : पणन मंडळाच्या रत्नागिरी पॅक हाऊसमधून साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया करून युरोपसाठी निर्यात करण्यात आला आहे. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील पॅक हाऊसला क्वारंटाइन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे उष्णजल प्रक्रिया सुरू झाली आहे.पॅक हाऊसमधून रशियाला बाराशे किलो आंबा निर्यात करण्यात आला आहे. फळमाशीविरहीत हापूसची मागणी रशियाने केली होती. त्यामुळे रत्नागिरीतील पॅक हाऊसमध्ये आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करण्यात आली आहे.
फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी आंबा आयातीवर बंदी आणली होती. उष्णजल किंवा बाष्पजल प्रक्रिया करण्याला अखेर मान्यता देण्यात आली होती. हापूसची साल पातळ आहे. परंतु ४७ अंश सेल्सिअसला ५० मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी, अशी सूचना करण्यात आली होती.
याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल अपेडाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे जुन्या निकषाव्दारेच आंब्यावर प्रक्रिया सुरू आहे.क्वारंटाइन विभागाकडून पॅक हाऊसला नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे रत्नागिरीतून होणारी थेट निर्यात रखडली होती. दोन वर्षे रत्नागिरी पॅक हाऊसमधून आंबा परदेशात निर्यात करण्यात आला नव्हता.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून पॅक हाऊससाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांसाठीची जबाबदारीसद्गुरू एंटरप्रायझेसह्णकडे देण्यात आली होती. क्वारंटाईन विभागाकडे नाहरकत दाखल्यासाठी प्रस्ताव केल्यानंतर अपेडाचे पथक नुकतेच रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी पॅक हाऊसची पाहणी केल्यानंतर उष्णजल प्रक्रियेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.पणन मंडळाच्या पॅक हाऊसमध्ये २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात आंबा प्री-कुलिंग केला जातो. त्यानंतर ४८ अंश सेल्सिअसला ६० मिनिटे आंबा ठेवून उष्णजल प्रक्रिया करण्यात येते. वॉशिंग व ब्रशिंग केल्यानंतर आंबा पॅक केला जातो. उष्णजल प्रक्रियेसाठी ७२० किलो व २४० किलो एवढ्या क्षमतेचे दोन टँक आहेत.
पणन विभागातील प्रक्रियेनंतर सीलबंद वाहनातून आंबा मुंबईत पाठविण्यात येतो. उष्णजल प्रक्रियेसाठी किलोला साडेआठ रूपये तर पॅकिंगसाठी ७ रूपये दर आकारण्यात येत आहे. रत्नागिरीच्या पॅक हाऊससाठी परवानगी मिळाल्यामुळे येथील आंबा थेट युरोपला रवाना होणार आहे. आतापर्यंत लासलगाव येथे आंबा प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत होता. मात्र, आता आंब्याचा हा द्रविडी प्राणायाम बंद झाला असून, थेट विमानतळावर आंबा जाणार आहे.