खेड : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरात हापूस विक्रीसाठी नेण्याकरिता आंबा बागायतदारांसमोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. बुधवारी तीनबत्तीनाका येथे हापूस विक्रीसाठी दाखल झाला असून, शेकडा ३५०० रुपये दराने हापूसची विक्री केली जात आहे; मात्र, ४ तासच विक्रीची मुभा देण्यात आल्याने ग्राहकांचा अत्यल्पच प्रतिसाद लाभत आहे.
बाजारात अडीच डझनाला १ हजार रुपये दर आकारून हापूसची घरपोच विक्री होत
आहे. ग्राहकांनीही हापूस खरेदीला पसंती देत घरपोच मिळणाऱ्या सेवेमुळे
ग्राहकही खूष होते. खाडीपट्ट्यातील बहुतांश गावांमध्ये हापूस तयार असूनदेखील शहरात विक्रीसाठी
आणायचा कसा? अशी चिंता आंबा बागायतदारांना सतावत आहे. काही
आंबा बागायतदारांनी ओळखीच्या गिऱ्हाईकांना गाठून घरपोच हापूसची विक्री
करण्याची शक्कल लढवली आहे.
एरव्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तीनबत्तीनाका येथे खाडीपट्ट्यासह दापोली तालुक्यातील गावातून हापूस विक्रीसाठी येथे दाखल होत होता.
मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हापूस तयार असूनदेखील शहराच्या ठिकाणी
येण्यास लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी अडसर ठरत आहे. बुधवारी तीनबत्तीनाका येथे हापूस विक्रीसाठी दाखल झाल्याचे समजताच अनेक
ग्राहकांनी हापूस खरेदीसाठी धाव घेतली.
--
khed-photo302
खेड : तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी दाखल झालेला हापूस.