रत्नागिरी : अवीट गोडी असणाºया हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पावसाने सवड दिल्याने शेतकरी बांधवही आंबा काढण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये दर कोसळल्याने शेतकरीबांधव सध्या खासगी विक्रीबरोबर कॅनिंगसाठी आंबा घालत आहेत.
हवामानातील बदलामुळे यावर्षी एकूणच हापूसचे उत्पादन कमी राहिले आहे. अति थंडीमुळे आलेल्या पुनर्मोहोराचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच सुरूवातीपासून थ्रीप्स, तुडतुडा व बुरशीसारख्या रोगामुळे मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती. पहिल्या टप्प्यातील आंबा एप्रिलमध्येच संपला. दुसऱ्या टप्प्यात फारशी फलधारणा नव्हती. परिणामी उत्पन्न किरकोळ होते. तिसऱ्या टप्प्यातील आंब्यावर थ्रीप्स प्रादुर्भाव भरपूर असल्याने फळांचा आकार कमी झाला. सध्या तिसºया टप्प्यातील आंबा काढणी सुरू आहे. १०० ते ३०० रूपये डझन दराने मुंबई मार्केटमध्ये विक्री सुरू असल्याने पॅकिंग, वाहतूक, हमाली, तोलाई खर्च परवडेनासा झाल्याने शेतकऱ्यांनी खासगी किरकोळ विक्री सुरू केली आहे. मुख्य रस्त्यालगत स्टॉल लावण्यात येत असल्यामुळे पर्यटकांकडून खरेदी होत आहे. वर्गवारी करून निवडक आंबा पेट्यामध्ये भरला जातो. उर्वरित आंबा किलोवर कॅनिंगला घातला जातो. २५ ते २६ रूपये किलो दराने आंबा खरेदी सुरू आहे. किलोवर आंबा घालता अन्य खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आंबा काढणी संपणार आहे.
हापूसबरोबर रायवळ, पायरी, केशर, आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी येत आहेत. कच्च्याबरोबर पिक्या आंब्याना प्राधान्याने मागणी होत आहे. पर्यटक वाहने थांबवून आंबा खरेदी करीत आहेत. जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे परदेशातूनही आंब्याला मागणी वाढली आहे.