दापोली : तालुक्यातील मांदिवली, केळशी, आडे, पाडले, लोणवडी परिसरात सध्या बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा विद्युत पुरवठा खंडित झाला की बंद पडत आहे. बॅकअपसाठी बॅटऱ्या आहेत; पण त्यांची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने त्याही काम करीत नाहीत. ब्रॉडबॅण्ड सेवा बंद झाली की, ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच ऑनलाईन काम करणारे यांची गैरसोय होत आहे.
शेडची दुरवस्था
देवरुख : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड बांधण्यात आले आहे. परंतु या निवारा शेडवरील कौले उडून गेली आहेत. त्यामुळे भरपावसात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने या निवारा शेडची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
तन्वी राऊतचा सत्कार
गुहागर : येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी उमेश राऊत हिने १० वीच्या परीक्षेत ९७.७ टक्के गुण मिळविले आहेत. त्यानिमित्त गुहागर येथील वरचा पाट मित्र परिवाराच्यावतीने तिचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक समीर घाणेकर यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.
राजवाडीत कोरोना चाचणी
देवरुख : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार ग्रामस्थांच्या आरोग्याच्यादृष्टीने संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे ग्रामपंचायतीत कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. निनाद धने आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने ही चाचणी आयोजित केली होती.
पुलावर खड्डे
देवरुख : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील शास्त्री पूल आणि सोनवी पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून जाताना वाहनचालकांना विशेष करून दुचाकीस्वारांना हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे.