रत्नागिरी : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत एका महिलेचा छळ करीत असून, त्याकडे पोलीसही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजप नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
कदाचित त्या महिलेचे कमी जास्त झाले किंवा त्या महिलेने आत्महत्या केली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला. खासदार राऊत अनेक वर्षांपासून त्या महिलेला छळत असून, ती महिला आजही सगळीकडे दाद मागत फिरत आहे. तिने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही दाद मागितली आहे. पण त्यांच्याकडूनही त्यांना न्याय मिळालेला नसल्याचे सांगत राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणाकडे पाेलीस लक्ष देत नसून तिची तक्रारही लिहून घेतली जात नाही. त्या महिलेच्या घराबाहेर काही माणसं ठेवली जात आहेत. त्यांच्याकडून तिच्यावर देखरेख केली जात आहे. त्या महिलेला आपण भेटलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
.................................
भाजप पैसे द्यायला तयार, प्रशासन तयार नाही
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आली आहे. बेड, ऑक्सिजन देण्यास सामाजिक संस्था, उद्योजक तयार आहेत. मात्र, प्रशासन त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही. आम्ही भाजप पैसे द्यायला तयार आहोत. मात्र, त्यासाठी प्रशासन तयार नाही, असेही माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.