आवाशी : खेड तालुक्यातील रास्तदर धान्य दुकानांवर सध्या सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य येत आहे. माती, सिमेंटचे व रेतीचे खडे धान्यातून जनतेला वाटण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. यापुढे असा प्रकार निदर्शनास आल्यास धान्याची पोती बदलून देण्यात येतील, असे पुरवठा निरीक्षकांनी सांगितले.खेड तालुक्यात रास्तदर धान्याची एकूण १२७ दुकाने आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या खादी ग्रामोद्योग वखारीतून हे धान्य तालुक्याला प्राप्त होत असते. मध्यंतरी धान्य येण्याचेच बंद झाले होते किंवा दरमहा येतही नव्हते. गेल्या चार महिन्यांपासून ते पुन्हा सुरु झाले आहे. मात्र, तीन महिन्यांपासून सातत्याने हे धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. धान्य घेण्यासाठी जाणाऱ्या महिला आपल्या कुटुंबप्रमुखाकडे याबाबत वारंवार तक्रार करत असतात. अशावेळी काहीजण संबंधित धान्य दुकानदाराला विचारणा करण्यास गेल्यास त्यांच्यात वाद होतात. तुम्हाला धान्य देण्याचे बंद करीन, अशी धमकीही काही रेशनदुकानदार देतात, त्यामुळे सर्वसामान्य कार्डधारक इतरत्र तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. याचाच फायदा बहुधा दुकानदार व संबंधित अधिकारी घेत असल्याचे दिसून येते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची व्यथा जाणून घेऊनत्यांना मतदानावेळी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी यावेळी डोळेझाक का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील गावोगावीच्या धान्यदुकानदारांना तांदूळ, गहू व इतर धान्याचे वाटप करण्यात आले. पुन्हा अशीच परिस्थिती आहे. तालुक्यातील इतर धान्य दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनीही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. (वार्ताहर)आमच्याकडे येणारे धान्य बंद पिशव्यांतून येते. त्याचे वाटपही तसेच वखार व्यवस्थापकाकडून वितरण केले जाते. मात्र, आमच्याकडे अद्याप एकाही धान्य दुकानदाराने तक्रार केलेली नाही. तक्रार आली तर आम्ही लगेच त्यांना ते पोते बदलून देऊ. तशी सूचना आम्ही वखार व्यवस्थापकाला दिली आहे. तालुक्याला येणारा तांदळाचा कोटा ३२४० टन, तर गहू २१०० टन इतका आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून कोटा दरमहा उपलब्ध होत असतो. ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिलेली बाब गांभीर्याने घेऊन संबंधित वखार व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग, रत्नागिरी व अन्न महामंडळ यांच्या निदर्शनास आणून देऊ.- पी. जी. कदम,तालुका पुरवठा निरीक्षक, खेडपुरवठा निरीक्षकांनी पोते बदलून देऊ, असे सांगितले तरी किती पोती बदलून आणणार? आणि प्रत्येकवेळी पोते बदलण्यासाठी येणारा वाहतूक खर्च आमच्याच खिशातून करावा लागणार. त्यापेक्षा त्यांनी वा संबंधितांनी धान्यच दर्जात्मक दिले तर शिधाधारकास व आम्हास दोघांनाही होणारा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास टळेल, असे दुकानदारांचे मत आहे.
निकृष्ट धान्याने रेशनदुकानदारच हैराण
By admin | Published: January 22, 2016 11:55 PM