लाेकमत न्यूज नेटवर्क
वाटूळ : फणसकिंग अशी ओळख असलेले कोकणचे प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र देसाई यांची कोकण कृषी विद्यापीठामार्फत दूरदर्शनच्या कृषी सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देसाई हे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी आहेत, ज्यांनी फणसाची लागवड केली आहे. फणसाच्या जगभरातील १२८ विविध जाती आहेत. त्यापैकी ७६ जातीची लागवड त्यांनी केली आहे. कोकणासोबत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फणस लागवड होईल, अशा विविध जातीची लागवड त्यांनी केली आहे. देसाई हे गेली दहा वर्ष फणस जे जगातील सर्वात मोठं फळ आहे, ज्याला ग्लोबल फ्रूट म्हणून ओळखलं जाते त्याची किंमत आणि त्याचं महत्व पटवून देण्यासाठी काम करत आहेत. केरळ राज्याचे तसेच श्रीलंका व बांगलादेशचे प्रमुख फळ फणस आहे. व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूरमध्ये फणस लागवड खूप प्रमाणावर आहे. जगाच्या मार्केटमध्ये फणसाला जी मागणी वाढली ती पाहता येत्या काळात कोकणात आणि महाराष्ट्रात फणसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
जगातील सर्वात मोठं फळ फणसाची लागवड वाढावी म्हणून त्याच्या लागवडीसाठी आराखडा तयार करून ‘जॅकफ्रूट मिशन फॉर केरळ व मेघालय’ असे उपक्रम त्या दोन राज्यांमध्ये सरकारने सुरू केले आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारनेही ‘जॅकफ्रूट मिशन फॉर महाराष्ट्र’ सुरू करावे, असे यावेळी देसाई यांनी म्हटले आहे.