मधुसूदन लेले गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. एन्व्हाॅरमेंटल सायन्स हा त्यांचा अध्यापनाचा विषय असला तरी संगीताची त्यांना प्रचंड आवड होती. हार्मोनियम वाद्याचे सुरुवातीचे शिक्षण चंद्रशेखर गोंधळेकर यांच्याकडे व त्यानंतर पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडे घेतले होते. २००२ पासून ते रत्नागिरीतील संगीत क्षेत्रात कार्यरत होते. ‘खल्वायन’ संस्थेच्या सर्व संगीत नाटकांना, शिवाय ‘खल्वायन’ आयोजित ५० टक्क्यांपेक्षा अधिक मैफलीला हार्मोनियम, ऑर्गनसाथ केली होती. अनेक दिग्गज कलाकारांच्या मैफलसाठी हार्मोनियम, ऑर्गनसाथ दिली होती.
गेले काही दिवस काविळीच्या आजारामुळे लेले यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर गोळप येथे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, आत्या, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. मधुसूदन लेले यांच्या निधनामुळे रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रातील तारा निखळला आहे.