दापोली : कोकण किनारपट्टीवर माहा चक्रीवादळाचे सावट घोंगावू लागले आहे. ह्यक्यारह्ण वादळामुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांनी आता माहा चक्रीवादळाचे धास्ती घेतली आहे. माहा चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरावर धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी समुद्रकिनारपट्टीवर आलेल्या ह्यक्यारह्ण वादळामुळे हर्णे, पाजपंढरी किनारपट्टीला फटका बसला. या वादळामुळे मच्छिमारांच्या सुमारे ४० ते ५० छोट्या फायबर होड्या (डिंगी) या उधाणात वाहूनच गेल्या. प्रत्येक डिंगी किमान ८० ते ९० हजाराची असल्याने सुमारे ४० लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.ह्यक्यारह्ण वादळ निवळल्यानंतर नौका मासेमारीकरिता गेल्या होत्या. मात्र, माहा चक्रीवादळाची चाहूल लागताच नौका माघारी फिरल्या आहेत. या नौकांनी मिळेल तिथे आसरा घेण्यास सुरूवात केली आहे. काही नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगड तर काही नौका दापोलीतील आंजर्ले, दाभोळ तर काही दिघी खाडीत उभ्या राहिल्या आहेत.शासनाकडूनही मच्छिमारांना सतर्क राहण्याचा आदेश आला आहे. तसेच बंदरखात्याकडून वादळाचा धोका असल्याचा बावटा देखील हर्णे बंदरात लावण्यात आला आहे. किनाऱ्यावर जोरदार वारा सुटला असून, अजस्त्र लाटा देखील येत आहेत.
वादळाच्या भीतीने कर्नाटक, श्रीवर्धन ,इतर बाहेरच्या नौका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नौका मिळून जवळजवळ ३०० ते ४०० मासेमारी नौकांनी जयगड खाडीचा आसरा घेतला आहे. तर आंजर्ले खाडीत देखील ३०० ते ४०० नौका घुसल्या आहेत.