शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील नंबर दोनचे बंदर म्हणून दापोली तालुक्यातील हर्णै बंदराची ओळख आहे. या बंदरात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. याठिकाणी होणाऱ्या लिलावात मासे खरेदी करून महिला मच्छीमार बाजूलाच समुद्रकिनारी मासे विक्री करतात. कोट्यवधींची उलाढाल होणारे हे मासेमारी बंदर अंधारात चाचपडत आहे. बंदरात वीज नसल्याने बंदरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.हर्णै बंदरातील हायमास्ट सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे इथल्या मच्छीमार महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. तसेच हर्णै बंदरातील लिलाव सुद्धा काळोख होण्यापूर्वी उरकून घेण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे. बंदरात बोटीवर डिझेल, पाणी घेऊन जातानाही अडचणी निर्माण होत आहे.हर्णै बंदरात वीज नसल्याने स्थानिक सुमारे ५०० मच्छीमार महिलांवर हर्णै बंदरात अंधारात मासे विक्री करण्याची वेळ आली आहे. काळोख असल्यामुळे पर्यटक फिरकत नसल्याने माशांची विक्रीही होत नसल्याचे मच्छिमार महिलांनी सांगितले. ही समस्या तात्काळ दूर करावी अशी मागणी मच्छीमार बांधवांमधून होत आहे.ग्रापंचायतींकडून हायमास्टचे वीजबिल न भरल्याने गेली दोन वर्षे येथील दिवे बंद आहेत. त्यामुळे येथील मासे विक्रेत्या महिलांना अंधारात बसून मासे विकावे लागत आहेत. काळोख असल्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक थांबत नाहीत, त्यामुळे मासे विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. वारंवार ग्रामपंचायतीडे मागणी करूनही विजेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे स्थानिक मासे विक्रेत्या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:30 PM