रत्नागिरी : शासनाने कोरोनाची रुग्ण संख्या घटू लागल्याने काही निर्बंध शिथिल केले असल्याने काही व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. हाॅटेल्स सुरू करण्यासाठीही परवानगी दिली असली तरी त्यासाठी कामगारांचे लसीकरण ही अट प्रामुख्याने घातली आहे. मात्र, हाॅटेलच्या मालकांनाच अजूनपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुठून देणार, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या आहेत.
जवळपास सात आठ महिने हाॅटेल्स बंद राहिल्याने आता सुरू करण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे.
मात्र, काही छोटे टपरीवाले, हातगाडीवाले यांनाही लस उपलब्ध नसल्याने काहींनी तसेच व्यवसाय सुरू केले आहेत.
.....................................
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हाॅटेलमध्ये सध्या २५ कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्यापैकी सहा जणांना पहिला डोस मिळाला आहे. तर दोन्ही डोस घेतलेले दोघे आहेत.
.................................
रत्नागिरी परिसरातील एका हाॅटेलमध्ये १३ कर्मचारी काम करीत आहेत. त्यांच्यापैकी केवळ चार जणांनाच लस मिळाली आहे. खुद्द मालकालाही अद्याप लस न मिळाल्याने या सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे.
...............................
अद्याप मालकांनाच लस नाही. तर कामगारांना कुठून मिळणार? याबाबत संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली आहे. त्यांनीही लस उपलब्ध झाल्यावर देण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे सध्या कामगारांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे.
- उदय लोध, हाॅटेल व्यावसायिक
..........................................
लस उपलब्ध होईल, तशी ती दिली जात आहे. हाॅटेलमधील कर्मचारी यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या उपलब्धता कमी असल्याने जेव्हा लस मिळेल, तेव्हा ती दिली जाईल. सध्या या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक आहे.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी