राजापूर : शंभर टक्के पाणीपट्टी वसूली न झाल्याने तालुक्यातील हसोळ ग्रामपंचायतीने नळपाणी पुरवठा योजना बंद ठेवून ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करायला लावल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. एकीकडे शासन लोकांना टंचाईच्या काळात टँकरने पाणी पुरवठा करत असताना ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला येथील ग्रामस्थांनी सहमती दर्शवत पाणीपट्टी १०० टक्के भरली होती. मात्र, यावर्षी कुणालाही कल्पना न देता पुन्हा ग्रामपंचायतीने २०० रुपयांची वाढ करत पाणीपट्टी वसूल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे गावातील अनेक ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत ग्रामसभा घेऊन त्यावर निर्णय घेण्यात यावा, मगच आम्ही पाणीपट्टी भरु, असे सांगितले होते. पाणीपट्टी भरण्यास ग्रामस्थांनी नकार दर्शवला होता. मात्र, ग्रामस्थांच्या या विरोधाला न जुमानता १०० टक्के पाणीपट्टी वसूल होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीने पाणी न सोडण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे. परिणामी ग्रामस्थांना पाणी पाणी करत वणवण भटकावे लागत आहे.ग्रामपंचायतीच्या या मनमानी आणि सुलतानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आम्हाला पाणी द्या; अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी केली जात आहे. पाणीपट्टी वाढवताना ग्रामपंचायतीने आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, तसे न करता आमचे पाणीच बंद केले आहे. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे येथील ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभेत जोपर्यंत पाणीपट्टी शंभर टक्के भरली जात नाही तोपर्यंत पाणी सोडायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती हसोळ ग्रामपंचायतीच्या सदस्या साधना पांचाळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. पाणीपट्टी भरली नाही म्हणून पाणी देणार नाही, हा ग्रामपंचायतीचा न्याय ग्रामस्थांवर अन्याय करणारा आहे. ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीने यावर निर्णय घ्यायला हवा होता. पाणी न देणे हा गुन्हा असून, त्याचा निषेध करत असल्याचे ग्रामस्थ अशोक प्रभूदेसाई यांनी सांगितले. या पाण्यासंदर्भात हसोळ ग्रामपंचयातीच्या सरपंच अंकिता पोटले यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पाणी नाकारता येत नसल्याची बाब आपण सदस्यांच्या व सरपंचांच्या लक्षात आणून दिली होती, अशी माहिती ग्रामसेवक प्रदीप सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)हसोळ ग्रामपंचायत हद्दीतील लाडवाडी येथील सुमारे १५० लोकसंख्येसाठी ही नळपाणी पुरवठा योजना असून, याठिकाणी ११ स्टॅण्डपोस्ट आहेत. मात्र, येथील ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी न देण्याचा निर्णय घेऊन चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला होता.- प्रदीप सावंत, ग्रामसेवकग्रामसभा घेऊन निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही ग्रामपंचायतीला पाणीपट्टी वाढवता येत नाही, तर पाणीपट्टी भरली नाही म्हणून कुणालाही पाणी नाकारता येत नाही. पाणी हा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती माहिती घेऊन दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- जयेंद्र जाधव,गटविकास अधिकारी, राजापूर
हसोळची पाणी योजना आठ दिवस बंद
By admin | Published: February 24, 2015 10:09 PM