मंदार गोयथळे ल्ल असगोली गुहागर तालुक्यातील तळवली - बौद्धवाडी येथील उमेश पवार या तरुणाने समाजसेवेचा वसा हाती घेत सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एका हातात आपल्याकडील झाडू घेत गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करत त्याने जणू स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. देशात सर्व स्तरावर स्वच्छता मोहीम राबवली जात असताना समाजसेवेच्या माध्यमातून उमेशने घेतलेला हा स्वच्छतेचा ध्यास खरोखरच कौतुकास्पद आहे. तळवलीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बाहेरगावी नोकरी मिळवत आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र, बाहेरगावी नोकरी करत असतानाच झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्याची प्रकृ ती बिघडली. परंतु दैवाचे पाठबळ असल्यावर अनेकजण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे उमेशदेखील मोठ्या अपघातातून दैवाच्या पाठबळावर सहीसलामत बाहेर आला. मात्र, सुरुवातीपासून समाजसेवेची आवड असणाऱ्या उमेशला अपघातामुळे आपल्या गावी राहावे लागले. अनेकांच्या आशीर्वादाच्या जोरावर अखेर उमेश सावरू लागला. यातच आपली समाजसेवा त्याने हळूहळू सुरू केली. अनेकांना तो आपल्या परीने मदत करताना दिसतो. गावातील महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याकडील झाडू घेऊन सकाळच्या प्रहरी तो स्वच्छता करताना दिसतो. सणवार वा अन्य महत्त्वाच्या दिवशी त्याचा हा उपक्रम सर्वांसाठी आपलुकीचा व आदर्श देणारा ठरतो. शासनातर्फे ‘स्वच्छ भारत मिशन’ राबवण्यात येत आहे. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असून, त्यासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा ठरत आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्व जाणून या अनोख्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. हातात झाडू घेऊन गावातील सार्वजनिक ठिकाणी एकट्याने स्वच्छता करण्यास कोणी धजावत नाही. एकत्रितपणे स्वच्छतेची मोहीम हाती घेणारे अधिक असतात, पण या सर्वांसाठी उमेश पवार अपवाद ठरत आहे.
‘त्या’ने घेतलाय स्वच्छतेचा ‘ध्यास’
By admin | Published: October 09, 2016 11:42 PM