खेड : पै. हुसेन परकार हायस्कूल, कोतवली येथे रोटरी क्लब लोटे, रोटरॅक्ट क्लब लोटे तसेच इनरव्हील क्लब लोटेकडून ‘सबला’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलींनी वाढत्या वयानुसार आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी, याविषयी माहिती देण्यात आली.
ऋतुजा कदम यांची निवड
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील लोवले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतुजा कदम, तर उपसरपंचपदी उद्योजक संजय शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत पॅनलचे नीलेश खापरे, राहुल फटकरे, सुनील जाधव, प्रियंका साळवी, मनाली दोरकडे, शालिनी पड्ये, समीक्षा दोरकडे आदी निवडून आले आहेत.
थकीत बिले प्राप्त
रत्नागिरी : गेले तीन महिने शासकीय दूध योजनेचे शेतकऱ्यांचे पैसे थकले होते. सहकारी दूध संस्था व खासगी डेअरीकडे शेतकरी वळू लागले होते. हे निदर्शनास येताच काँग्रेसचे अशोक जाधव यांनी पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांना थकीत बिले प्राप्त झाली आहेत. दुग्धवाढीच्या व्यवसायाला पशुवैद्यकीय आधार मिळावा, यासाठी रिक्त अधिकाऱ्यांची जागा तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांमध्ये समाधान
आरवली : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर, नायरी, निवळी, तिवरे शाखेसह रस्ता व तुरळ कडवई, चिखली, तांबेडी, अंत्रवली, कळंबस्ते या दोन्ही रस्त्यांना निधी प्राप्त झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. ६.५० कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यामुळे लवकरच शेतीचे काम मार्गी लागणार आहे.
सुपर फास्ट स्पेशल गाडी
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर तिरुवनंतपुरम - निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७ एप्रिलपासून ही सुपर फास्ट स्पेशल रेल्वे धावणार आहे. तिरुवनंतपुरम येथून दरबुधवारी दुपारी २.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता निजामुद्दीनला पोहोचणार आहे.
आवक वाढली
रत्नागिरी : उष्मा वाढल्याने आंबा तयार होऊ लागला आहे. त्यामुळे वाशी मार्केट येथील आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यांतून २३ ते २४ हजार पेट्या पाठविण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात ७ ते ८ हजार पेट्यांची आवक होती. मात्र, आता दुपटीने वाढली आहे. भाव मात्र २ ते ४ हजार रुपये प्राप्त होत आहे.
प्रीमिअर लीग स्पर्धा
खेड : तालुक्यातील धामणदिवी येथील सुबोध सकपाळ मित्र मंडळातर्फे दिनांक २८ व २९ मार्च अखेर प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघास १० हजार २१, उपविजेत्या संघास ५०२१ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
हरिनाम सप्ताह
आवाशी : खेड तालुक्यातील किंजळे येथील उदय क्रीडा मंडळातर्फे दिनांक २७ ते ३० मार्चअखेर अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने घटस्थापना, वीणा व ध्वजपूजन २७ रोजी होणार असून कीर्तन, जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. दिनांक ३० रोजी गाथा पारायण व काल्याचे कीर्तन होईल. महाप्रसादाने सांगता होणार आहे.
आंजर्ले - बोरिवली बस
दापोली : तालुक्यातील आदर्श गाव वीरसईमार्गे ३० मार्चपासून दापोली - आंजर्ले - वीरसई - बोरिवली नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. पहाटे ६.३० वाजता दापोली येथून तर रात्री ८ वाजता वीरसई येथून गाडी रवाना होणार आहे. पहाटे ५.३० वाजता बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून रवाना होणार आहे.