चिपळूण : ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि चाळण बनलेल्या गुहागर बायपास रस्त्यावर आता जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. शहरातील कचरा या रस्त्यालगत टाकला जात असून, उक्ताड व खेंड बावशेवाडी परिसरात उघड्यावर फेकल्या जाणाऱ्या घरगुती कचऱ्यामुळे नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
स्वाध्यायपुस्तिका वाटप
दापोली : तालुक्यातील आसूद येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बिवलकर यांच्या माध्यमातून आसूद ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पाच शाळांमध्ये मोफत स्वाध्यायपुस्तिका वाटप करण्यात आल्या. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
जनावरांच्या शिंगांना लावले रेडियम
देवरूख : संगमेश्वर रामपेठ परिसरातील युवकांनी रात्री ११ वाजेपर्यंत मोकाट सोडून दिलेल्या जनावरांच्या शिंगांना रेडियम बसविण्याचा स्तुत्य उपक्रम संयुक्त मोहिमेद्वारे राबविला आहे. मोकाट जनावरे वाहनचालकांना दिसावीत यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
बिबट्याच्या संचाराने नागरिकांमध्ये भीती
मंडणगड : बिबट्याच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे मंडणगड तालुक्यातील बोरथळ येतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाजवळच्या जंगलात बिबट्याचा वावर वाढला असून, शेतात जाण्यासाठी आणि या रस्त्याने करण्यासाठी नागरिक घाबरत आहेत.
रॉकेलपासून नागरिक वंचित
रत्नागिरी : जिल्ह्यात व्हाइट रॉकेल विक्रीचे कुणीही टेंडर न घेतल्याने जिल्ह्यात रॉकेलच मिळत नाही, तर फक्त रेशनवर मिळणारे निळे रॉकेल जनतेला उपलब्ध आहे. अनेक वेळा व्हाइट रॉकेलची गरज भासते. परंतु रॉकेलच मिळत नसल्याने जनतेची गैरसोय झाली आहे.