चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात व महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांप्रश्नी उद्या, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे. गणेशोत्सव जवळ आलेला असताना पनवेल ते वडखळ नाका व रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने न्यायालयाच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण २०११ पासून सुरू आहे. मागील तेरा वर्षात अतिशय दिरंगाईने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम घेतलेल्या कंपन्यांनी चालढकल केल्यामुळे हे काम रखडले. ठेकेदार कंपन्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उचलल्यानंतर त्यांनी कायदेशीर लढाई सुरू केली. त्यामुळे ठेकेदार कंपन्यांचा अधिकच वेळ हा रस्ता बनवण्यापेक्षा न्यायालयात युक्तिवाद करण्यात गेला. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील आपली हातबलता दाखवून दिली. रस्त्याचे चौपदरीकरण होईल तेव्हा करा परंतु किमान खड्डे तरी बुजवा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड.ओवेस पेचकर गेली काही वर्ष लढा देत आहेत.सरकार आणि ठेकेदार कंपनीने न्यायालयासमोर महामार्गाचे काम पूर्ण होण्यासंदर्भात अनेक वेळा तारखा दिल्या. परंतु त्या तारखांना अद्याप काम पूर्ण झालेले नाही. गणेशोत्सव जवळ आला आहे. सरकारने महामार्ग खड्डे मुक्त आणि एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण करून हा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तेही अद्याप सुरू झालेले नाही. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांचे फोटो ॲड.पेचकर यांनी आज न्यायलासमोर ठेवले. रस्त्याची एकूण परिस्थिती पाहता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये यांनी शुक्रवारी सकाळी तातडीची सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी
By संदीप बांद्रे | Published: August 10, 2023 4:24 PM