जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दोन दिवस आधीच आगमन केले आहे. दरवर्षी साधारणत: ७ जूनपासून पावसाला प्रारंभ होतो. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून पावसाच्या आगमनात अनियमितता आली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
गेल्यावर्षी ३ जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात चार दिवस पाऊस पडत होता. त्यानंतर तो नियमित झाला होता. यावर्षीही १६ मे रोजी तौक्ते वादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात अनेक भागांत अतिवृष्टी झाली. त्यातच अधूनमधून पाऊस सुरू होताच. यावर्षी ३१ मेला मान्सून केरळात आल्यानंतर दहा दिवसांत तो कोकणात येईल, असा अंदाज असतानाच ६ जूनलाच मान्सून कोकणात दाखल झाला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर घेतला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. त्यानंतर काहीवेळ उघडीप होती. या कालावधीत सूर्यदर्शनही झाले. त्यानंतर दुपारी पुन्हा पावसाने संततधारेने बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकणात १० जूनपासून पुढे पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाची सुरूवातीपासूनच जोरदार सलामी सुरू झाली असल्याचे दिसू लागले आहे.