चिपळूण - दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात पुढील किमान चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यातच चिपळुणात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक वरुण राजाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. नागरिकांनी भिजतच काही ठिकाणी आडोशाचा आधार घेतला. या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या लग्न मंडपाची दाणादण उडाली. गोवळकोट भागातील शेतीत पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास देखील या पावसाने हिरावला.
या पावसाचा शेतीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आली असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. हा पाऊस तसा नुकसानकारक असला तरी रब्बी पिकांसाठी मात्र महत्त्वाचा ठरणार आहे.
ऐन थंडीच्या या महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दोन्ही ऋतुचा अनुभव मिळत आहे. सकाळच्या सुमारास थंडगार वातावरण तर दुपारच्या सुमारास गरमी. यातच सायंकाळच्या सुमारास या पावसाच्या सरी. यावातावरणामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
१४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटसह तुरळक ठिकाणी पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.