रत्नागिरी : शनिवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरीतील आपला मुक्काम सोमवारीही कायम ठेवला आहे. सोमवार सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर लांजातील मुचकुंडी नदी आणि राजापूरमधील कोदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर आले आहे. सुदैवाने खेड, दापोली, संगमेश्वर येथील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.रविवारी जिल्ह्यात 145 मिलिमीटर च्या सरासरीने पाऊस पडला असून सर्वाधिक सुमारे नऊ इंचापेक्षा अधिक पाऊस खेड तालुक्यात पडला आहे. शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आपला जोर रविवारीही कायम ठेवला होता तसाच पाऊस सोमवारी सकाळच्या सत्रातही पडत आहे. शनिवार सकाळपासून रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 122 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता तर रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 145 किलोमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात कोसळला आहे. त्या खालोखाल चिपळूण, दापोली आणि मंडणगडमध्ये अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी बरेच नुकसान झाले आहे. खेड शहरात तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. चिपळूण शहराच्या काही भागातही पुराचे पाणी वाढले होते. सोमवारी सकाळी या चारही ठिकाणच्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूर्व सरला आहे. काल पुरामुळे बंद झालेली खेड दापोली वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली आहे. रत्नागिरी शहर आणि तालुक्यात मात्र पावसाने चांगला जोर धरला आहे काहीशी तशीच परिस्थिती लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये आहे.
रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीवर
By मनोज मुळ्ये | Published: July 15, 2024 11:32 AM