गुहागर : तालुक्यात पावसाने मंगळवारी रात्री जोरदार हजेरी लावली. गुहागर शहरात तसेच तालुक्यात यामुळे काही ठिकाणी पाणी भरले. पालशेत पुलावरून पाणी गेल्याने काहीवेळ वाहतूक बंद होती.
मंगळवारी रात्री तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पालशेत येथील बाजारपुलावरून पहाटे चार वाजता पाणी जाऊ लागले. बुधवारी सकाळी काहीवेळ या पुलावरील वाहतूक बंद झाली होती. तसेच पालशेत मच्छीमार्केट परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी घुसण्याची भीती निर्माण झाली होती. गुहागर शहरातील साकवी परिसरातील नयन गोयथळे व त्यांच्या शेजारील घरांमध्ये पाणी पोहोचले. शहरातील खालचापाट परिसरातही अंगणापर्यंत पाणी पोहोचले होते. सुदैवाने बुधवारी काही तास पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरले. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीप्रमाणे गुहागर मंडलात १३० मिलिमीटर, पाटपन्हाळे व हेदवी मंडलात १०६ मिलिमीटर, आबलोली मंडलात १०० तर तळवली मंडलात १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चालू हंगामातील ही सर्वाधिक नोंद आहे.
बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दुपारी बारानंतर पुन्हा काही तास पाऊस पडत होता. दरम्यान, तहसील कार्यालयात काजुर्ली येथील गोठ्याचे अंशतः नुकसान झाल्याची एकमेव नोंद झाल्याचे सांगण्यात आले.