चिपळूण : हवामान खात्याने कोकणात १० ते १२ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुराचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. अशातच चिपळुणात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने चिपळूण शहराबरोबरच तालुक्याला झोडपून काढले होते. तसेच तौक्ते चक्रीवादळाचाही जोरदार फटका बसला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानाच्या पंचनाम्याची प्रक्रिया नुकतीच झाली. त्यानंतर आता पुन्हा हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे.
तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा नेहमीचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची एक टीम शुक्रवारी सकाळीच येथे दाखल झाली.शुक्रवारी सकाळी काहीशी उघडीप होती. मात्र,१० वाजल्यापासून ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र काळोख पसरला होता. त्यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरु झाला. साधारण तासभर हा पाऊस पडत होता. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. परंतु, पावसाची रिपरिप सुरुच होती. या पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरात १२० कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क करण्यात आले आहे. तसेच फायबर बोटी व अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.