चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे मुसळधार पावसाने तीन घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे छत कोसळल्याने ही घरे धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने या कुटुंबांना तातडीने घरकुलांची मदत करावी, अशी मागणी टेरवचे माजी उपसरपंच किशोर कदम यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. रविवारी शहरात नगर परिषदेचे सार्वजनिक शौचालय कोसळले होते, तर सोमवारी टेरव येथे तीन घरांचे नुकसान झाले आहे. टेरवमधील सचिन म्हालीम, प्रकाश यादव, गौऱ्या साळवी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच टेरवच्या सरपंच स्वप्नाली कराडकर, उपसरपंच मानसी कदम, माजी उपसरपंच किशोर कदम, अशोक साळवी, उमेश मोहिते, काशीनाथ कदम, वर्षा वासकर, संजीवनी मेगे, वैशाली तांदळे, प्रतीक्षा शिगवण आदींनी पाहणी केली. तीनही घरांचे मुसळधार पावसात छताचे नुकसान झाल्याने घरात पाणी कोसळत आहे. तात्पुरते प्लास्टिकचे आच्छादन करून या कुटुंबांची गुजराण सुरू आहे. या कुटुंबांची मातीची घरे जीर्ण झाल्याने त्यांना घरकुलांची आवश्यकता आहे. प्रशासनाने त्यांना निवाऱ्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी किशोर कदम यांनी ग्रामपंचायतीतर्फे केली आहे.