रत्नागिरी : शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. ६० टक्के शेतकरी हळवे भात, तर २० टक्के निमगरवे, २० टक्के गरवे भात लागवड करण्यात आली आहे. गरवे, निमगरवे भात कापणीस तयार झाले असून, गरवे भात मात्र तयार होण्याच्या मार्गावर आहे. हळवे भात शेतकऱ्यांनी कापणीस सुरूवात केली होती.
शुक्रवारी शेतकऱ्यांनी कापलेले भात पावसामुळे शनिवारी शेतकऱ्यांना उचलण्याची संधी प्राप्त झाली नाही. शनिवार, रविवारी पाऊस असल्याने दोन दिवस कापलेले भात पाण्यातच राहिले. मळेशेतीत पाणी साचल्याने तयार भात जमीनदोस्त झाल्याने तेही पाण्यात होते. सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे.सोमवारी पाऊस नसला तरी दिवसभर मळभच होते. त्यामुळे भात खाचरातील पाणी काढून टाकून मळेशेतीतील भात काढून अन्यत्र वाळविण्यासाठी टाकण्यात येत होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कातळावर भात वाळविण्यास टाकले होते त्यांनी आहे त्या परिस्थितीत मळणी काढून पेंडा वाळायला टाकला आहे.
पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास काढून घेतला आहे. भात शेतावरच भिजले तरी कृषी विभाग, लोकप्रतिनिधीकडून याची दखल घेतलेली नाही. कोकणातील शेतकऱ्यांची शेती गुंठ्यात विखुरलेली असल्याने मालकीचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे.-व्ही.एन.गुरव, शेतकरी