चिपळूण : अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. शनिवारी सुमारे दीड तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. चिपळूण रेल्वेस्थानकावरही शेकडो प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. दुपारी दीड वाजताचे सुमारास धीम्यागतीने रेल्वे वाहतूक सुरू झाली.पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी रात्रीपासून ढगफुटीसारखा पाऊस पडला. या पावसाने सर्वच यंत्रणेला तडाखा दिला. मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता तर दुसऱ्या बाजूला कोकण रेल्वेलादेखील याचा फटका बसला. रेल्वेमार्गावर वीर-माणगाव दरम्यान घोडनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार गाड्या यामुळे थांबविण्यात आल्या होत्या.रत्नागिरी - दादर पॅसेंजर गाडी वीर स्थानकावर थांबविण्यात आली होती. तर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी कोलाड येथे थांबविण्यात आली होती. त्याचप्रमाणे एर्नाकुुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस गाडी करंजाडी येथे तर मांडवी एक्स्प्रेस गाडी रोहा येथे थांबविण्यात आली होती.
त्यामुळे कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळपत्रक कोलमडले. रेल्वे वाहतूक लवकर सुरू व्हावी यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत होते. अखेर मार्गावरील पाणी ओसरल्याने रेल्वेच्या पथकाने पाहणी केल्यानंतर वाहतूक धिम्यागतीने सुरु करण्यात आली.