पाचल : मुसळधार पावसाचा जोरदार फटका राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांना या नुकसानाची महिती दिली. त्यानंतर तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास आधिकारी सागर पाटील, मंडल अधिकारी गजानन राईन, तलाठी विकास भंडारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली व आपद्ग्रस्तांना धीर दिला.
मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराचे पाणी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजावाडीतील अरुण प्रभुदेसाई यांच्या घरात व गोठ्यात शिरले. पाण्याचा प्रचंड प्रवाह घरात शिरत असल्याने त्यांनी आपले कुटंब ग्रामपंचायत सभागृहामध्ये स्थलांतरित केले. गोठ्यातील म्हशी बाहेर काढत असताना त्यातील एक म्हैस दाव्यासहित नदीच्या दिशेने पळाली व पुरात वाहून गेली. या म्हशीची आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ५० हजार रूपये किंमत आहे. या म्हशीबरोबरच त्यांनी वर्षाची बेगमी करून ठेवलेल्या दोन गवताच्या गंजी (वैरण) वाहून गेल्या. अरूण प्रभुदेसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
इंजनवाडीतील शेतकरी संतोष मसूरकर यांची नदीकाठी असलेली पाच एकरवरची भातशेती वाहून जाऊन त्या जागेवर गाळ व दगडांचा खच पडला आहे. शासनाने त्यांच्या शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याच्या लाेंढ्यामुळे ब्राह्मणदेव येथील शेतकरी बाबाजी गोरे व गणेश अनंत कोलते यांच्या घरातील साहित्य वाहून गेले. मोरेवाडीतील राधिका राजाराम चव्हाण यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. राववाडी येथे सुरेश गुडेकर यांच्या जुन्या घरामागील दरड (घळण) ओढ्यात कोसळल्याने येथील पाच एकर मातीत गाडली गेली आहे. बाजारवाडीतील दिलीप साळवी यांचे नदीकाठचे भातशेत वाहून गेले आहे. एकंदरीत या मुसळधार पावसाने मोठा दणका तळवडे गावाला दिला असून, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, आप्पा साळवी, शैलेश साळवी, संजय कदम यांनी केली आहे.