रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. सायंकाळपासून पावसाला जोरदार सुरूवात होत असून, रात्रभर पाऊस सुरू राहात असल्याने जिल्ह्यात अनेक भागात पडझडीला प्रारंभ झाला आहे. काही भागात पाणी भरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८८८.२० मिलिमीटर (९८.६९) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली असून, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १९३.३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल संगमेश्वर (१२३.९० मिलिमीटर) आणि राजापूर तालुक्यात (११४.८० मिलिमीटर) पाऊस झाला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे दरड कोसळली. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्याने रस्ता बंद झाला आहे. संगमेश्वर येथे रस्त्यावर झाडे कोसळल्याने रस्ता बंद होता. बांधकाम विभागाकडून झाडे हटविण्याचे काम सुरु आहे.
रत्नागिरी तालुक्यात उक्षी येथे शनिवारी स्वप्नाली कांबळे यांच्या घराशेजारी दरड कोसळली. या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. तसेच या गावात (टेंभ्ये पूल) येथे (एमएच ०८ एएफ ४२१६) ही दुचाकी वाहून गेली. लांजा - वेरळ रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून, दरड हटविण्याचे काम सुरु आहे.
रविवारी रात्रीही पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळी काही काळ सूर्यदर्शनही झाले. दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा सायंकाळपासून जोरदार बरसण्यास सुरूवात केली.