रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारीही पावसाचा जाेर कायम होता. गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण ९६५.२० मिलिमीटर (सरासरी १०७ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गुहागर तालुक्यात (२०२.४० मिलिमीटर) झाला असून दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यांना पावसाने अधिक झोडपून काढले आहे. संगमेश्वर तालुक्यात पडझडीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
बुधवारीही पावसाचा जोर कायम होता. सकाळी सकाळी सूर्यदर्शन झाल्यानंतर पाऊस विश्रांती घेईन, असे वाटत होते. मात्र, काही वेळातच पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली. दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत हाेत्या. तापमान खाली आल्याने वातावरणातही चांगलाच गारवा आला होता. या पावसाने जिल्ह्यात काही भागात पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या आलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात मुरसुडे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम चालू आहे. चिपळूण तालुक्यात पावसेवाडी येथे विष्णू कांबळे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशतः नुकसान झाले आहे.
गुहागर-चिपळूण-कराड रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली असून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवून वाहतूक सुरू झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात मांजरे येथे गोविंद रामचंद्र पाडावे यांच्या घराचे पावसामुळे अंशतः १५,५०० रुपये नुकसान झाले आहे. या तालुक्यात घरांची पडझड अनेक भागात झाली आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी नाही.
तालुक्यात सुनीता जाधव (२५०००), रुपेश गोताड ( ५,५०,०००), मोहन साठे (१५,०००), मंगेश साठे (१६,०००), कमलाकर तोटे (२०,०००), संतोष राजाराम गोठेकर (४,५०,०००) तसेच गोळवली येथे महेंद्र गमरे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशतः २,००,००० रूपयांचे नुकसान झाले आहे. कळंबोशी येथे सुधीर चव्हाण यांच्या घराचे
अंशतः १,००,००० रुपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी नाही.