रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे.यावर्षी सुरूवातीपासून पाऊस चांगला झाला. अनेक गावामध्ये आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले. पुराच्या पाण्यासह गाळ भातशेतीत साचला. शिवाय भातशेती तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजली. त्यामुळे शासनाकडून याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.
गणेशोत्सवापूर्वी पडलेल्या उन्हामुळे ठिकठिकाणी करपा, निळे भुंगेरे, पान गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. किडरोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पुन्हा पावासाचे आगमन झाले. मात्र, संततधार पाऊस वाढल्याने पुन्हा भातशेती नुकसानात आली आहे.भात प्रसविण्याच्या स्थितीत जोरदार पावसामुळे फुलोरा पावसाच्या जोरामुळे लोंब्यामध्ये दाण्याऐवजी (पिस) चिंब होण्याची शक्यता आहे. पूरजन्य गावातील भातशेती धोक्यात आली. शिवाय मुसळधार पावसाने हळवे भातपीक धोक्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पावसाचे पाणी खाचरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचून राहिले आहे. हळव्या बियाण्याबरोबर निमगरव्या भाताला धोका निर्माण झाला आहे. बऱ्यापैकी पाऊस होऊनही भातपीक धोक्यात आले आहे. सुरूवातीला पिकांची परिस्थिती उत्तम होती.सर्वाधिक नुकसानकृषी विभागाने खरीप हंगामासाठी ८२ हजार ९०२ हेक्टरचे लक्ष्य देण्यात आले होते. पैकी ६५ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड तर नागली, तृणधान्यासह भाजीपाल्यासह मिळून एकूण ७९ हजार ८०८ हेक्टरवर लागवड करण्यात आली. मात्र, सर्वाधिक पावसाने नुकसान झाले आहे.