मंडणगड : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील माहू उत्तेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरी व तिला लागून असणारा रस्ता वाहून गेला आहे. या भागातील ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मंडणगड - अडखळ मार्गावरील नगर पंचायतीच्या हद्दीतील धोकादायक मोरी वजा पूल नगर पंचायतीने वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे बाजूच्या रस्त्याने कोंझर ते अडखळ अशी वाहतूक सुरु आहे. माहू उत्तेकरवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर धोकादायक उतारावरील अवघड वळणाची मोरी पावसाने वाहून गेली आहे. त्यामुळे गावाची वाहतूक काही काळासाठी बंदही झाली होती. मोरीला लागून असलेल्या ओढ्याला पाणी भरल्याने मोरी परिसरातील डांबरी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे मोरीचे पाईपही दिसू लागले आहेत. ग्रामस्थांनी तात्पुरती उपाययोजना म्हणून वाहून गेलेल्या रस्त्याच्या भागात माती व दगड टाकले असले तरी जिल्हा परिषदेने मोरीच्या डागडुजीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मंडणगड - अडखळ मार्गावर कोंझर याठिकाणी धोकादायक झालेली मोरी नगर पंचायतीने ताैक्ते चक्रीवादळानंतरच बंद केली होती. मात्र, या मार्गावरुन प्रवास करणारे ग्रामस्थ अवैधरित्या या मोरीचा वाहतुकीसाठी वापर करत असल्याची बाब नगर पंचायतीच्या निदर्शनास आल्याने नगर पंचायतीने गेट लावून मोरीवरील वाहतूक बंद केली आहे. बाणकोट बौद्धवाडीत जाणाऱ्या रस्त्यालाही तडा गेला असून, रस्ता खचला आहे. त्यामुळे यावरुन वाहतूक करणे गैरसोयीचे झाले आहे.
------------------------
मंडणगड तालुक्यातील माहू येथे मोरी वाहून गेली असून, नगर पंचायतीने कोंझर येथील धोकादायक मोरी वजा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.