रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार, दिनांक २७ ऑगस्ट राेजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरु झाली आहे.मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (२६ ऑगस्ट) पनवेल पळस्पे येथील महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान महामार्गावरील वाहतूक काेंडीचा मंत्री चव्हाण यांना फटका बसला. त्यानंतर त्यांनी महामार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखकर प्रवास करता यावा म्हणजेच रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक काेंडी हाेऊन महामार्गाच्या कामाला विलंब हाेत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अवजड वाहनांसाठी मुंबई-गाेवा महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाहनांची वाहतूक खालापूर येथील पर्यायी मार्गाने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. महामार्गावर वाहतूक काेंडी हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही निर्देश देण्यात आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:25 PM