असगोली : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणामध्ये शृंगारतळी बाजारपेठेची रस्त्याची उंची कमी होणार आहे. ती पाचवरुन केवळ एक ते दोन फूट करण्याची सूचना आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली.शृंगारतळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत आमदार भास्कर जाधव, गुहागर - विजापूर मार्गाचे अधिकारी, संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी, व्यापारी, ग्रामस्थांची पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात बैठक पार पडली.आमदार जाधव यांनी अजित बेलवलकर यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन केले. सुरुवातीला बाजारपेठेतील रस्त्यांची उंची सहा फूट आहे. ती दीड ते दोन फूट होईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांसमोर सांगितले. बाजारपेठेतील १.५५ किलोमीटरची अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
रिक्षा स्टॅण्ड, रिक्षावाल्यांना बसण्यासाठी एका बाजूला निवारा शेड, रस्त्याचे काम सुरु होण्यापूर्वी वीज खांब बदलणे, पाणी पुरवठा करणारी वाहिनी बदलणे, ही कामे सुरुवातीला होतील, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.शृंगारतळी पुलाची रुंदी १०० मीटर आहे. ती १६ मीटर होईल. जोड रस्ते आहेत, ते व्यवस्थित करण्यात येणार आहेत. आमदार जाधव यांनी मोडकाआगर पुलाची पाहणीही केली. पाटपन्हाळे महाविद्यालयासमोरील गडगोबा या देवस्थानची पाहणी करुन हे देवस्थान वाचावे, अशी सूचना त्यांनी दिली.
यावेळी तहसीलदार लता धोत्रे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, सरपंच संजय पवार, ठेकेदार शिवाजी माने, पाटपन्हाळे गावचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, उपसभापती सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक उपस्थित होते.