सावर्डे : चिपळूण शहर आणि परिसरात २२ आणि २३ जुलैरोजी आलेल्या महापुराने अतोनात नुकसान केले. अनेक गावांना याचा फटका बसला. येथील पूरग्रस्तांना कर्तव्यभावनेने मुलुंड येथील सहस्त्रधारा फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तू, कपडे, औषधे आदींची मदत करण्यात आली. पूरग्रस्तांच्या घरी जाऊन ही मदत देण्यात आली.
एलआयसी युनिटची मदत
रत्नागिरी : भारतीय विमा कर्मचारी सेना एलआयसी युनिटच्यावतीने चिपळूण शहर आणि परिसरातील पूरग्रस्तांना शेगड्या, एलईडी ट्युब यासह अन्य साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. शहरातील बहाद्दूर शेख नाका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मदत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पावस विद्यामंदिरचे यश
पावस : येथील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरच्या ३२ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. ८ वी इयत्तेकरिता ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. गुणवत्ता यादीत आलेल्या १८ विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत १८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती सुरू झाली आहे.
पुस्तकांचे वितरण
चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मुंबई विद्यापीठ पुरस्कृत मागासवर्गीय पुस्तक पेढीत या योजनेंतर्गत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एससी, एसटी, डीटी व एनटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी या योजनेचे समन्वयक प्रा. राहुल पवार व ग्रंथपाल सुधीर मोरे उपस्थित होते.
रक्तदान शिबिर
मंडणगड : कोरोना महामारीच्या काळात रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन मंडणगड तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मुबीन परकार यांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील शिपोळे बंदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.