चिपळूण : मुंबई येथील समाजसेविका अमरजा चव्हाण आणि चिपळूणच्या संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांच्या विशेष सहकार्याने हेल्प फाउंडेशन चिपळूण संस्थापक अध्यक्ष पत्रकार सतीश कदम यांच्या हस्ते चिपळुणात दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
चिपळूणमध्ये २२ जुलै रोजी आलेल्या महाप्रलयंकारी पुरात चिपळूणवासीयांचे अतोनात नुकसान झाले. अनेक राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था मदतीला आल्या. परंतु या सर्व लाभापासून चिपळूणमधील पूरग्रस्त असलेले दिव्यांग बांधव वंचित राहत आहेत. हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कदम यांनी तत्काळ त्यांना मदतकार्य करण्याचा निर्णय घेतला. सतीश कदम, संस्थेचे सदस्य दीपक शिंदे व सूरज कदम यांनी शहरातील रॉयल नगर येथील दिव्यांग नागरिकांचे कार्यालय गाठले. सोबत असलेले जीवनावश्यक वस्तूंचे कीट असंख्य दिव्यांगांना भेट म्हणून दिले. दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधित्व करणारे शरीफ मुजावर यांनी सर्व दिव्यांग नागरिकांना एकत्र करून हेल्प फाउंडेशनच्यावतीने मदत वाटपासाठी प्रयत्न केले.
यापुढे जेव्हा गरज भासेल, तेव्हा हेल्प फाउंडेशन दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठाम उभे राहील. दिव्यांग नागरिकांच्या या कार्यालयातील संगणकाचे महापुरात नुकसान झाले आहे. लवकरच हेल्थ फाउंडेशनकडून येथे संगणक देण्यात येईल, असे सतीश कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी अपंग बांधवांच्या संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच हेल्थ फाउंडेशनचे सदस्य दीपक शिंदे, सूरज कदम, राजेश जाधव, अनिल फाळके, ओंकार रेळेकर यावेळी उपस्थित होते.