संदीप बांद्रे, चिपळूण: मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाची तज्ज्ञ समितीने चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाची कोसळलेल्या उड्डाणपुलासंदर्भात मंगळवारी प्राथमिक बैठक झाली. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर काढणे आणि लाँचर काढण्याचे काम हे अतिशय अवघड असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने यासंदर्भात अशी कामे केलेल्या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याचे ठरले. त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाशिष्ठी पुलाजवळून बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालय दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक ते पिलर उभारल्यानंतर पुलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू झाले होते. अशातच काम सुरू असताना बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलासाठी बसवलेले गर्डर आणि लाँचर कोसळली. त्यावर शासनाने तज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार दिल्ली येथे मंगळवारी प्राथमिक बैठक घेण्यात आली. उड्डाणपुलाचे गर्डर हटवणे आणि लाँचर काढण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे अशी कामे केलेल्या एजन्सीची अथवा संस्थेची मदत देखील घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी ईगल कंपनीने आणखी एख लाँचर देखील आणला आहे. मात्र काम सुरू असताना जोडलेले गर्डर कोसळले. त्यामुळे गर्डर जोडणीसाठी आणखी उच्च तंत्रज्ञानाची अवलंब करण्याची चाचपणी देखील केली जात आहे. कोसळलेल्या पुलाचे गर्डर हटविण्यासाठी पुढील काही दिवसात आणखी एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. उड्डाणपुलासंदर्भात प्राथमिक बैठक झाली असली, तरी त्यामध्ये गर्डर हटविण्यासाठी अंतिम नियोजन अजूनही झालेले नाही. उड्डाणपुलाच्या दुर्घटनेस महिनाभराचा कालावधी उलटला तरी गर्डर हटवण्या संदर्भातील आराखडा तयार झालेला नाही. तज्ज्ञ एजन्सीची मदत घ्यावी लागणार असल्याने उड्डाणपुलाच्या कामास आणखी विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन मीटरच्या सर्व्हिस रोडचेही काम थांबले
उड्डाण पुलाच्या दुर्घटनेनंतर तेथील परिसर लोखंडी पत्रे उभारून बंदिस्त केला आहे. त्यामुळे तेथील रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय सर्व्हिस रोड अरुंद असल्याने वाहतुकदारांची नियमित गैरसोय होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा केल्यानंतर उड्डाण पुलाच्या हद्दीत दोन मीटरने सर्व्हिस रोड वाढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागासह ठेकेदार कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.