दापाेली : शिवसेनेच्या तीन सदस्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीनेच स्वपक्षाच्या पंचायत समिती सदस्य व सभापती रऊफ हजवाने यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव अखेर ९ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला. दापोली पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पक्ष एकत्र येऊन अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला असून, आता सभापती व उपसभापती कोण होणार, याकडेच लक्ष लागले आहे.
पंचायत समिती सभापती पदाचा कार्यकाळ पूर्ण हाेऊनही रऊफ हजवाने यांनी राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खदखद सुरू होती. त्यातूनच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. अखेर शिवसेनेचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा अशा एकूण ९ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादीचा एक अशा तीन सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे हा ठराव ९ विरुद्ध ३ मतांनी मंजूर करण्यात आला.
पक्षादेश झुगारून शिवसेनेच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देत अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार का, हेच पाहायचे आहे.
................................
पक्षातील लाेक विराेधात
दापोली पंचायत समितीचे सभापती हजवाने यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकांनीच विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. तसेच अविश्वास ठराव आला असता पक्षातीलच सदस्यांनी अनुमोदन केले. त्यामुळे ही भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येणार का, हेच पाहायचे आहे.