रत्नागिरी : चिपळूण शहर आणि परिसरातील महापुराचा फटका बसलेल्या भोई समाजातील पूरग्रस्तांना सेवा संघामार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संघामार्फत या पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह वस्तूरुपी मदतही करण्यात आली. पूरग्रस्तांनी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
मोकाट जनावरांचा त्रास
रत्नागिरी : शहरातील मुख्य मार्गावर तसेच नाचणे मार्गावर सध्या मोकाट जनावरे आणि श्वानांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. दिवसा तसेच रात्री ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात. काळोखात असल्याने काही वेळेला वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे शहरातील काही भागात दुचाकीस्वारांचा अपघात घडण्याचे प्रकार घडले आहेत.
सफाई कामगारांची भरती
रत्नागिरी : लाड - पागे समितीने शासनाकडे केलेल्या शिफारशीनुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेत सफाई कामगारांच्या भरतीची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पदाधिकारी आणि खातेप्रमुख यांच्या समन्वयातून सर्व नियमांचे पालन करुन ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी ही पदे भरण्याचे नियोजन तज्ज्ञांनी केले आहे.
वडाळातर्फे बाधितांना मदत
देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वडाळा (मुंबई) तर्फे कोकणात संगमेश्वर तालुक्यात मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर यांच्या प्रेरणेने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांतर्फे मदत
खेड : तिसंगीचे सुपुत्र आणि ठाण्याचे नगरसेवक दशरथ पालांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोस्ती विहार ज्येष्ठ नागरिक संस्था, ठाणे, वर्तक नगर या संस्थेच्या माध्यमातून खेड, चिपळूण, महाड येथील पूरग्रस्तांना ५०० जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित केले आहेत. याप्रसंगी या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.