वाटूळ : काेराेना काळात पितृछत्र हरवलेल्या मुलांना माजी विद्यार्थ्यांनी माय राजापूर संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. पितृछत्र हरवलेल्या तालुक्यातील चार कुटुंबातील सात मुलांना पन्नास हजार व अन्य साहित्याची मदत या विद्यार्थ्यांनी केली आहे. या उपक्रमासाठी माय राजापूरचे प्रदीप काेळेकर यांचे सहकार्य लाभले.
तालुक्यातील वडदहसोळ गितयेवाडी, शेंबवणे मधलीवाडी, शेंढे वरचीवाडी तसेच वडदहसोळ खालीलवाडी येथील या सात मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या आईशी संवाद साधून त्यांना धीर दिला. घरातील इतरांशी बोलून या बिकट परिस्थितीतून मार्ग काढावा यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता आमची राजापूर हायस्कूलची १९७९-८०ची बॅच भविष्यातही यथाशक्ती मदत करेल, असे सांगून कुटुंबाचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला.
या कुटुंबातील सातपैकी पाच मुले ही चार वर्षे व आतील आहेत. तर एकाच कुटुंबातील दोन मुले दहा व बारा वर्षे वयाची आहेत. या असहाय्य कुटुंबांना शासकीय काही लाभ मिळवून देता येतील का, यासाठी हे विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. तसेच सर्व कुटुंबांशी यापुढेही फोनद्वारे सतत संपर्कात राहू, असे प्रदीप कोळेकर यांनी सांगितले.
या मदत कार्यात माजी विद्यार्थी व नानिवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष शेंबवणेकर, राजापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक व माजी अर्बन बॅंकेचे चेअरमन राजेंद्र कुशे, राजापूर हायस्कूलमधील सहाय्यक शिक्षक राजन लिगम, राजापूरचे प्रतिष्ठात व्यापारी गुरूनाथ भोगटे यांनी सहभाग घेतला हाेता. तसेच मदत निधीत ३५ विद्यार्थिनींनी सहयोग दिला हाेता.