अडरे : चिपळूण तालुका काँग्रेसने कोविड साहाय्य व मदत केंद्राच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना चांगला मदतीचा हात दिला आहे़ जवळपास १४० हून अधिक रुग्णांना आयसीयू व्हेंटिलेटर या हेल्पलाईनच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळवून दिले आहेत.
चिपळूण युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांनी ही माहिती दिली़
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना बेड व रेमडेसिविर मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना मदत मिळावी म्हणून युवक काँग्रेसने हेल्पलाईन सुरू केली होती. १५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत साधारण बेड ८०, ऑक्सिजन ४५, व्हेंटिलेटर १५ त्याचबरोबर रेमडेसिविर, प्लाझ्मा टोसिलीजुमेब इंजेक्शन मिळवून देण्यात असल्याची महिती फैसल पिलपिले यांनी दिली़
याशिवाय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपजिल्हा रुग्णालयात ५००० मास्क दिले़ तसेच गरजू कुटुंबांना आर्थिक मदत, पोलीस प्रशासनाला १ लाखाची मदत, जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप केले़ तसेच गरजू कुटुंबांना अन्नधान्य, रेशन कीट, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट वाटप, गरम पाण्याचे बॉटल अशा विविध प्रकारची मदत केली असल्याची माहिती फैसल पिलपिले यांनी दिली.