देवखेरकी रस्त्याची दुरवस्था
रामपूर : रामपूर ते देवखेरकी, नारदखेरकी रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले आहे. नुकतेच तौक्ते वादळ झाले. या परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने या मार्गावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे माती वाहून गेल्याने रस्त्याला मोठे चर पडले आहेत.
दापोली रस्त्यावरील चिखल हटवला
दापोली : कॅम्प दापोली आणि मौजे दापोली यांना जोडणाऱ्या रस्त्यावर आलेली माती भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका जया साळवी यांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून जनतेसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. दरवर्षी या रस्त्यावर पहिल्या पावसात माती येऊन वाहनचालकांना व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.
हेल्मेटसक्ती रद्द करा
चिपळूण : आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता तौक्ते वादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच शहरात बॅरिकेट्सने मार्ग बंद केल्याने अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. बाजारपेठ मुख्य रस्ता मोकळा ठेवावा व हेल्मेटसक्ती रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर सचिव अक्षय केदारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
चिपळुणात ऑनलाइन उन्हाळी शिबिर
चिपळूण : इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटी संचालित एसीबी इंटरनॅशनल आणि एसीबी प्ले स्कूल मार्कंडीतर्फे चिपळूणमधील विविध शाळांमधील लहान मुलांकरिता विशेष २०२१ उन्हाळा मज्जामस्ती ऑनलाइन शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. झूम ॲपद्वारे शिक्षक मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्ले ग्रुप ते ज्युनिअर केजी मुलांकरिता डान्स, योगा आणि मजेदार फनी गेम्स व अन्य उपक्रम राबविले जाणार आहेत.
दूषित पाणी सोडल्याने चौकशीची मागणी
खेड : लोटे एमआयडीसीतून पुन्हा दूषित पाणी सोडण्यात आले आहे. ज्या केमिकल कंपनीकडे ईटीपी प्लांट नाही, अशा कंपन्या पावसाळ्यात नाल्यामधून दूषित पाणी सोडतात, असा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, सोनपात्रा नदीमध्ये दूषित पाणी सोडल्यामुळे मासे मेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.
दिवसाला ३०० ते ४०० लसी द्याव्यात
चिपळूण : अपुऱ्या लसीमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ४५ वयोगटांवरील अनेकांना अद्याप पहिला डोसही मिळालेला नाही. तर, दुसऱ्या डोससाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून शहराला ऑफलाइन पद्धतीने दिवसाला ३०० ते ४०० लसी द्याव्यात, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.
निवासी शेडसाठी फॅनची भेट
दापोली : श्री आदर्श मित्र मंडळ दापोली यांच्या सौजन्याने दापोली उपजिल्हा रुग्णालय येथील निवासी शेडमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना फॅन व मच्छर अगरबत्ती आदी वस्तूंची सोय करून देण्यात आली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष तेजस जाधव, सचिव धीरज राजपूरकर, सदस्य मंगेश राजपूरकर, ओंकार दुर्गावळे, नीरज दुर्गावळे, साईराज बहुतुले, नील दुर्गावळे, तेजस घाणेकर उपस्थित होते.