सन्मान निधीचे वितरण
रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरणात आकर्षकता आणण्यासाठी ही योजना आता ऑनलाइन करण्यात आली आहे. यातील वितरित करण्यात येणारा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यानुसार, प्रथम आपापल्या क्षेत्रातील लेखापाल व कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
भोसले यांची निवड
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी अनुजा भोसले, तर उपजिल्हाध्यक्षपदी स्नेहल चव्हाण यांची निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी निवड जाहीर केली. संपूर्ण जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेड वाढवायची असून, यासाठी तालुका व ग्रामशाखा सुरू करण्यात येणार आहे.
ओम शिंदेचे यश
खेड : पिच्चांक सिलॅट फेडरेशन ऑफ इंडिया व जम्मू काश्मीर सिनेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पिच्चांक फाइट स्पर्धेत वेरळ येथील ओम शिंदे याने ७० ते ७५ वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुयश पाटील, प्राचार्य एस.एस. अली, व्ही.एच. तिसेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कराटे स्पर्धेत यश
साखरपा : येथील राज विलास कदम व हर्षल राजू कांबळे या विद्यार्थ्याने काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्य पदक मिळवून यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावून भारतीय संघात प्रवेश मिळविला होता. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामस्थांचे योगदान
राजापूर : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेले सर्व नियमांचे पालन करुन सर्व ग्रामस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन तळवडेचे सरपंच प्रदीप प्रभूदेसाई यांनी केले आहे. वाडीवस्तीवर जनजागृती करण्यात येत असून, गावात ठिकठिकाणी फलक व लॉकडाऊनबाबतची माहितीवजा सूचना जाहीर केल्या आहेत.
परीक्षा लांबणीवर
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नीट व पीजीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. १८ एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र, आता नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच परीक्षा होणार आहे.
ग्रंथालय सुरू करणार
खेड : थोर व्यक्तींचे जीवनचरित्र व त्यांचे महान कार्य आजच्या तरुण पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी पंचायत समितीमध्ये ग्रंथालय सुरू करून थोर व्यक्तींबाबत माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे यांनी स्पष्ट केले. सेस निधीतून ग्रंथालय सुरू करण्यासाठी तरतूद केली जाणार आहे.