जाकादेवी : चिपळुणातील पूरग्रस्तांना रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाने गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवून व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष साफसफाई करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
चाफे मयेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावागावात फिरून अन्नधान्य गोळा केले. याकामी दानशूर व्यक्तींनी सढळहस्ते मदत केली. धान्य, स्त्री-पुरुषांसाठी मिळून एक हजार कपड्यांची किट तयार करून पेठमाप, वालोपे, पेढे या भागातील पूरग्रस्तांना मदतीचे प्रत्यक्ष वाटप केले.
याकामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना यांसह माजी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, एनसीसी विभाग प्रमुख प्रा. गणेश कुळकर्णी, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. अवनी नागले, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विकास शिंदे, प्रा. कविता जाधव, प्रा. राजेश धावडे, प्रा. सुप्रिया दाते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे काम केले. चिपळूण येथे मदतीचा हात देताना मयेकर शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले तसेच कर्मचारी लक्षद्वीप कांबळे उपस्थित होते.
पेठमाप येथील तीन घरातील व देवळातील गाळ व पुरामुळे साचलेला केरकचरा काढण्याचे काम विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे केले. चिपळूण बाजारपेठेतील दुकानदारांनाही मदत केली. बांदल हायस्कूल येथेही परिसर स्वच्छता करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे व उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड इत्यादी अधिकारीही उपस्थित होते. विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापकांना व प्राचार्या या सर्वांचे संस्थेचे चेअरमन सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी या सेवाभावी टीमचे कौतुक केले.