लांजा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. लांजा तालुक्यातही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावातील अनेक नागरिक या कोरोनाचे बळी पडत आहेत. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून अपुऱ्या साधनसामग्री सेवा बजावताना आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी वर्ग यांना मर्यादा पडत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजा या सामाजिक संघटनेच्या वतीने तालुक्यातील साटवली आरोग्य केंद्राला आरोग्यविषयक साहित्याचे वाटप केले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघातर्फे प्राथमिक स्थरावर कोरोनाचे निदान करणारे ऑक्सिमीटर २,इन्फ्रारेड थर्मामीटर २, सॅनिटायझर ५ लिटरचे २ कॅन, तसेच १०० मिलीच्या ५ बाटल्या, हॅंडग्लोव्हज ४००, मास्क ५०० तसेच अन्य वैद्यकीय साधनसामग्री लांजा तालुक्यातील साटवली आरोग्य केंद्रात केंद्र अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे, डॉ. तावडे, सुपरवायझर साळुंखे यांच्याकडे सुपुर्द केल्या. इसवलीच्या आशा सेविका प्रमिला कदम यांना ऑक्सिमिटर लांजा शाखा उपाध्यक्ष सुभाष पालकर यांच्या माध्यमातून देण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम लांजा शाखा अध्यक्ष संतोष माटल, सचिव संदीप पडये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यासाठी लांजा शाखा खजिनदार प्रकाश चंदुरकर, कुणबी युवा लांजाचे पदाधिकारी शाहू सावंत यांचे सहकार्य मिळाले. ग्रामीण स्तरावर लांजा शाखा सहसचिव चंद्रकांत करंबेळे, ग्रामीण सचिव वसंत घडशी, गवाणेचे माजी सरपंच आत्माराम करंबेळे, साटवलीचे सरपंच दत्ताराम सावंत, कुणबी समाज सक्रिय कार्यकर्ते महेश चंदुरकर, गणेश चंदुरकर आदींचेही सहकार्य लाभले.