देवरुख : संगमेश्वर तालुक्याचे तहसीलदार सुहास थोरात यांच्या आवाहनानंतर देवरुख कोविड सेंटरसाठी अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संगमेश्वरी भजन मंडळाने देवरुख कोविड सेंटरसाठी ५ हजार रुपयांची मदत दिली आहे. ही रक्कम तहसीलदार यांच्याकडे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केली आहे.
यावेळी मंडळाचे महेंद्र नांदळजकर, नंदू पांचाळ, विक्रांत जाधव व प्रदीप लिंगायत उपस्थित होते. हे भजन मंडळ सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान देत असून, सामाजिक बांधीलकीची भावना मंडळाकडून जोपासली जात आहे. तालुक्यातील अनेक लोककलावंतांना एकत्र आणून संघटनेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या मंडळाकडून होत आहे. कोरोनाकाळात सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णतः बंद आहेत. असे असतानाही कठीण काळात मंडळाने केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.