लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी येथील युवकांनी आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत ‘हेल्पिंग हॅण्ड’ संकल्पनेतून ‘मोफत घरपोच जेवण’चा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाला बळ देण्यासाठी चिपळूण तालुक्यातील काही दानशूर हात सरसावले आहेत.
लोकांची भूक भागवणाऱ्या या उपक्रमाला आपलाही हातभार लागावा, यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे काही लोक पुढे आले आणि त्यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत या ‘हेल्पिंग हॅण्ड’ला दिली.
कोरोना महामारीत युवा कार्यकर्ते मनोज जाधव व सिध्देश लाड यांच्या संकल्पनेतून ‘हेल्पिंग हॅण्ड’ ही एक आदर्शवत मदतीची चळवळ शहरात उभी राहिली आहे. कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे जेवणावाचून हाल होऊ नयेत़, यासाठी त्यांना अगदी हॉस्पिटलपासून घरापर्यंत मोफत घरपोच जेवण हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी आमदार शेखर निकम व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी टीम झटत आहे. कोरोनाबाधित रुग्ण असतानाही जीवाची पर्वा न करता संपूर्ण टीम सामाजिक जाणीवेतून सेवा देत आहे.
दरराेज दिवसाला शंभरहून अधिक लोकांना घरपोच जेवण दिले जात आहे. त्यांच्या या उपक्रमाचे केवळ कौतुक करून बाजूला न होता आर्थिक मदतीचा हात देऊन या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी दानशूर व्यक्तीही आता पुढे येऊ लागल्या आहेत. चिपळूण महावितरणचे उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर, दहिवली येथील महेश घाग, तर गोविंद निकम कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी मनोज जाधव, सिध्देश लाड, नदीम उंडरे, दादू गुढेकर, विपीन कापडी, विश्वनाथ कांबळे उपस्थित होते.
---------------------
चिपळूण महावितरणचे उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर यांच्याकडून मनोज जाधव, सिध्देश लाड, नबीम उंबरे, शबू गुढेकर, विपीन कापडी, विश्वनाथ कांबळे यांच्याकडे मदत देण्यात आली.