रत्नागिरी : रत्नागिरी तालुुका राेहिदास समाज सेवा संघ यांच्यातर्फे सेंथ उर्सूला संस्थेला चादर, ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. संघाने आतापर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. अनेक संस्थांना आजही मदतीची गरज असल्याने अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संघातर्फे त्यांच्या अडचणी सोडविल्या जातात.
कांदे, बटाट्याचा दर उतरला
रत्नागिरी : सध्या भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेपर्यंत सुरू ठेवली जात आहेत. सध्या म्हणावा तसा भाजीपाल्याचा तसेच कांदे - बटाटे यांचा उठाव होत नसल्याने रस्त्यावरील विक्रेते कमी दराने विक्री करू लागले आहेत. सध्या २५ रुपये किलो दराने कांदे आणि बटाटे यांची विक्री केला जात आहे.
आंब्यापासून मुंबईकर वंचित
मंडणगड : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याअनुषंगाने सुरू झालेले लाॅकडाऊन यामुळे चाकरमानी सध्या मुंबईतच अडकले आहेत. मुंबईत कोरोना वाढला असल्याने सध्या बाहेरही पडता येत नसल्याने या चाकरमान्यांना गावांत येऊन तसेच मुंबईत राहूनही यावर्षी आंब्याचा स्वाद घेता येत नाही. एकंदरीत यावर्षी मुंबईकर आंबा, फणसापासून वंचित रहाणार आहेत.
पर्यटन स्थळांना पर्यटकांची प्रतीक्षा
दापोली : मे महिना म्हणजे पर्यटनाचा महत्त्वाचा महिना असूनही यावर्षी कोरोनामुळे तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवसायही लाॅकडाऊनमुळे ठप्प झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मुले उकाड्याने बेजार
गुहागर : कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे लहान मुलांना पालक घराबाहेर पाठवत नाहीत. त्यामुळे ही बालके आधीच कंटाळलेली आहेत. त्यातच वाढत्या उष्म्यामुळे घरात कमालीचा उकाडा होत असल्याने ती अधिकच त्रस्त झाली आहेत. अनेक बालकांना घामोळ्यांसारखे त्वचेचे विकार त्रास देऊ लागले आहेत.
पाणी टंचाई तीव्र
राजापूर : अनेक दुर्गम भागांना मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. आता मे महिना सुरू झाल्याने उष्मा वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटून गेले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच अनेक गावांमध्ये पाळीव जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे.
आगी लागण्याचे प्रमाण वाढले
देवरूख : सध्या उष्णता मोेठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक भागात सुकलेले गवत असल्याने सध्या सुरू असलेल्या भाजावळींमुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वणव्यांमुळे अनेक भागातील आंबा, काजू बागायतींना मोठ्या प्रमाणावर आगी लागत असून बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
मान्सूनपूर्व कामांची चिंता
खेड : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने अनेक ग्रामीण भागामध्ये कामे करणारी माणसे सध्या मिळत नसल्याने घरे, गोठे दुरुस्तीची कामे खाेळंबली आहेत. तसेच शेतीची मान्सूनपूर्व कामेही थांबली आहेत. सध्या कृषीविषयक सेवा देणारी दुकाने केवळ ७ ते ११ या वेळेत सुरू असल्याने दुर्गम भागातील शेतकऱ्यांना ही वेळ साधणे शक्य होत नाही. त्यामुळे ही कामे करायची कधी, ही चिंता वाढली आहे.
निराधारांची उपासमार
रत्नागिरी : शहरात अनेक निराधार व्यक्ती विविध प्रार्थनास्थळे, उद्याने तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी मिळत असलेल्या भिक्षेवर उदरनिर्वाह करीत असतात. मात्र, सध्या ही सर्वच स्थळे बंद असल्याने तसेच नागरिकांना बाहेर पडण्यासही प्रतिबंध असल्याने या निराधारांची भिक्षा बंद झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.
संस्था धावल्या मदतीला
रत्नागिरी : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अनेक कुटुंबे बाधित होऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच रुग्णसंख्या वाढल्याने कोविड रुग्णालयांवरही ताण येऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा मिळताना अनेक समस्या सतावत आहेत. मात्र, अनेक सामाजिक संस्था रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीला धावून येत आहेत.