मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी पाठोपाठच्या तीन मुली, मजूर कामामुळे पतीला मिळणारी तुटपुंजी रक्कम त्यामुळे घरातील पाच माणसांचा प्रपंच चालवणे अवघड होते. मुली अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना पुढे शिकवले पाहिजे. मात्र, एकट्या पतीच्या मोलमजुरीतून कुटुंबाची गुजराण करणे शक्य नसल्यामुळे आपण काहीतरी केले पाहिजे, या उद्देश्यातून टेंभ्येपूल येथील संपदा सुनील आग्रे यांनी मनोमन निश्चय केला व त्या घराच्या बाहेर पडल्या. रत्नागिरीत येऊन त्यांनी ओळखीतून घरकामाची काही कामे मिळवली. संसाररूपी रथाचे एक चाक पती ओढत असले तरी दुसरे चाक आपण बनले पाहिजे तरच ऐन महागाईत रथ ओढणे शक्य होईल, हे संपदा यांना पटल्यामुळेच त्या कार्यरत आहेत. संपदा यांच्या सासरचा गोतावळा मोठा आहे. परंतु प्रत्येकाची चूल वेगळी, घरात कोणीही नोकरदार नाही. सर्व मंडळी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत. स्वत:ची शेती नाही. त्यामुळे गावातील परंतु सुस्थितीतील लोकांची शेती ‘अर्धळी’ने करावयाची जेणेकरून दररोज लागणाऱ्या तांदळाची किमान गरज तरी भागते. पावसाळ्यात शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? दररोजच्या खर्चासाठी पैशांची गरज भासतेच. गावातील मजुरीच्या कामात सातत्य नसल्यामुळे शहरात येऊन काहीतरी करावं, हा निश्चय केला. संपदा स्वत: सातवीपर्यंत शिकलेल्या. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिकता आले नाही. मात्र, मुलांना शिकवायचंच हा जणू त्यांनी पण केला होता. पदरात तीन मुली, मुलगा नसल्याची खंत मात्र त्यांनी कधीच बाळगली नाही. मुलींना त्यांच्या आवडीनुसार शिकवायचं, यासाठी त्यांनी घरकामे स्वीकारली. गेली दहा वर्षे त्या घरकाम करीत आहेत. पहाटे उठून घरातील सर्व कामे आटोपून पती व मुलांचे डबे बांधून देऊन त्या सकाळच्या गाडीने रत्नागिरीत येतात. दुपारी ३ ते ३.३०पर्यंत सर्व कामे आटोपून साडेचार वाजेपर्यंत मिळेल त्या गाडीने घरी परतात. घरी गेल्यानंतर पुन्हा घरातील अन्य कामे, स्वयंपाक हे ओघाने आलेच. वर्षभर त्यांचे वेळापत्रक जणू ठरलेले. मुलींना आईच्या कष्टाची जाण आहे. शिवाय पतीचाही पाठिंबा असल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावते. गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मोठी मुलगी दहावीमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला वाणिज्य, विज्ञान शाखेकडे जायचे होते. मात्र, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अशक्य असल्याने गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच अकरावीला प्रवेश घेतला. बारावीतही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या ती शहरातील एका खासगी रूग्णालयात नोकरी करीत आहे. दोन नंबरची कन्या बारावीत, तर तीन नंबरची कन्या इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहेत. तिन्ही मुली अभ्यासात हुशार आहेत. सर्वच मुली झाल्या म्हणून नाराज न होता संपदा व सुनील आग्रे या दाम्पत्याने मुलींसाठी कष्ट उपसण्याचा चंग बांधला आहे. रत्नागिरी शहरात घरकाम करीत असताना भात पेरणी, लागवडीबरोबर कापणीसाठी लागणाऱ्या रजा याविषयी त्या आधीच परवानगी घेतात. मुली लहान असल्यापासूनच त्या घरकाम करीत आहेत. मोठ्या मुलीचे आता वर्ष, दोन वर्षात लग्न करावयाचे आहे. दोन नंबरच्या कन्येला बारावीनंतर तिच्या आवडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. धाकटी पुढच्या वर्षी दहावीत जाणार आहे. त्यामुळे पतीच्या मजुरीत थोडासा हातभार आपणही लावा, या उद्देशाने संपदा यांची अखंड वाटचाल सुरू आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे संपदा आग्रे यांनी स्वत: घरकामं करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पतीनेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यामुळे त्यांनी ओळखीतून घरकामं मिळवली. त्यातूनच त्यांच्या हातात थोेडेफार का होईना; परंतु पैसे येऊ लागले. आपल्याला शिकता आलं नाही; परंतु मुलीतरी खूप शिकल्या पाहिजेत, या धडपडीने त्यांची वाटचाल सुरु आहे.
पतीच्या मजुरीला मिळाली ‘तिच्या’ घरकामाची मदत
By admin | Published: October 09, 2016 11:37 PM