रत्नागिरी : नाटक, चित्रपट यातून अप्रतिम खलनायक रंगवणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांच्यात संवेदनशील माणूस कायम जागृत राहिला, त्याचा प्रत्यय १९९९ साली निवडणुकीच्या वेळी समाजवादी मंडळींनी काढलेल्या प्रबोधन यात्रेवेळी आल्याची प्रतिक्रिया येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज निधन झाले. त्या अनुषंगाने डॉ. मुळ्ये यांनी आठवणी जागृत केल्या. १९९९ साली विधानसभा निवडणुका घोषित झाल्या. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, टाक खंडणी’चे राजकारण मुंबईसह कोकणात वाढू लागले होते. या धर्मांध राजकारणाविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके आदी समाजवादी मंडळींनी मतदारांमध्ये प्रबोधन व्हावे, त्यांनी कुठल्याही प्रकाराला बळी न पडता, निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रभर या मंडळींनी ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ यात्रा काढली. या यात्रेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रत्नागिरीत दत्तमंगल कार्यालयात या ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ कार्यक्रमाचे आयोजन अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर, सदाशिव अमरापूरकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. हरी नरके हे चौघेही उपस्थित होते. यावेळी हे मंगल कार्यालय तुडुंब भरले होते. या निवडणुकीसाठी मतदारांनी जागृत व्हावे, यासाठी या चौघांनी केलेली भाषणे अतिशय प्रभावी झाल्याचे डॉ. मुळ्ये यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यक्रम झाल्यानंतर डॉ. लागू आणि सदाशिव अमरापूरकर यांनी या यात्रेसाठी मदतीचा हात मागताच तिथल्या तिथे १२,००० रूपये जमा झाले होते. सर्व ठिकाणच्या यात्रेपेक्षा रत्नागिरीत मिळालेली ही रक्कम सर्वाधिक होती. सदाशिव अमरापूरकर खलनायकाच्या भूमिका केवळ रंगवित असले तरी त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव किती तीव्र होती, हे त्यावेळी दिसून आले. अभिनेता म्हणून ते श्रेष्ठच होते. पण त्यांच्यातील संवेदनशील व्यक्ती सतत जागृत राहिली, कार्य करत राहिली, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)अमरापूरकर यांच्यातील संवेदनशील माणूस कायम जागता राहिला.अंधश्रध्दा निर्मुलन समितीने वाहिली शब्दपुष्पांजली.अमरापूरकर यांनी यात्रेच्या मदतीसाठी हात मागताच जागच्या जागी १२ हजार रूपये जमा.सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला माणूस
पडद्यावरचा खलनायक होता वास्तवातला नायकच
By admin | Published: November 03, 2014 10:29 PM